Mpsc Chalu ghadamodi / Current affairs / चालू घडामोडी 12th Nov. 2024
न्या. संजीव खन्ना यांचा सरन्यायाधीशपदी शपथविधी
न्या. संजीव खन्ना यांनी देशाचे ५१वे सरन्यायाधीश म्हणून सोमवारी शपथ घेतली.राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या छोटेखानी सोहळयामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. खन्ना बांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, मावळते सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल आणि माजी सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्यासह अन्य महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या.
न्या. खन्ना यांनी ईश्वराचे स्मरण करून इंग्रजीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
१४ मे १९६० रोजी जन्मलेल्या न्या. खन्ना यांना सरन्यायाधीश म्हणून सुमारे सहा महिन्यांचाच कालावधी मिळणार असून १३ मे २०२५ रोजी वयाच्या ६५व्या वर्षी ते निवृत्त होतील. न्या. धनंजय चंद्रचूड रविवारी निवृत्त झाल्यानंतर सोमवारी न्या. खन्ना यांचा शपथविधी झाला.
ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सरन्यायाधीशांचा संक्षिप्त परिचय :
जन्म: १४ मे १९६० रोजी दिल्लीस्थित एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला.
वडिल : न्या. देव राज खन्ना, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. एच. आर. खन्ना यांचे पुतणे आहेत.
आई : सरोज खन्ना, दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये हिदीच्या प्राध्यापक होत्या.
अपत्ये दोन : एक मुलगा, एक मुलगी
शालेय शिक्षण : मॉर्डन स्कूल, दिल्ली १९७७
पदवी शिक्षण : सेंट स्टिफन कॉलेज, दिल्ली १९८०
विधी शिक्षण : दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले.
वकिली : वकिलीची सुरुवात त्यांनी १९८३ साली दिल्लीच्या न्यायालयातून केली
उच्च न्यायालय : दिल्ली उच्च न्यायालयात २००५ साली अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
सर्वोच्च न्यायालय : १९ जानेवारी २०१९ रोजी न्यायाधीश नियुक्त.
सरन्यायाधीश : ११ नोव्हेंबर २०२४ रोजी देशाचे ५१वे सरन्यायाधीश
प्रलंबित खटले निकाली काढून त्यांची संख्या कमी करणे व तत्काळ न्याय देण्यास त्यांनी प्राधान्य दिले.
न्या. खन्ना यांची कायद्यावर जबरदस्त पकड आहे. यात घटनात्मक कायदा, प्रत्यक्ष कराधान, मध्यस्थता कायद्याचा समावेश आहे. याशिवाय वाणिज्यिक, कंपनी, भूमी, पर्यावरण आणि वैद्यकीय निष्काळजीपणा या कायद्यांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा देताना ते अनेक ऐतिहासिक निकालांचा भाग राहिले आहेत.
ईव्हीएमची विश्वसनीयता कायम ठेवणे, ईव्हीएमची सुरक्षितता, बुथ कॅप्चरिंग आणि बोगस मतदान दूर करणे,
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरवणे,
निवडणूक रोखे योजना गुंडाळणे आणि
अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याच्या निकालांवर खन्ना यांची छाप होती.
भारत सोडणाऱ्या श्रीमंतांचा ओढा कोणत्या देशाकडे?
भारत सोडून कायमचे इतर देशांत जाणाऱ्या कोट्यधीशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बरेचसे धनाड्य आखाती देशांची निवड करीत आहेत.
सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य, करांमध्ये सवलत, निवृत्तीनंतरचे आयुष्य, नव्या व्यावसायिक संधी, चागंल्या जीवनमानाची अपेक्षा, चांगल्या शिक्षणाच्या संधी, आरोग्याच्या सुविधा आणि चांगल्या दर्जाचे आयुष्य जगण्यासाठी कोट्यधीश स्थलांतरित करत आहेत.
श्रीमंतांचा ओढा कोणत्या देशाकडे क्रमवार सांगायचे झाले तर : UAE, अमेरिका, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया
0 टिप्पण्या