👇👇 Chalu ghadamodi-Current affairs 9 july 2022 in Marathi
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या
Shinzo Abe
जपानचे माजी पंतप्रधान शिजो आबे यांची शुक्रवारी सकाळी हत्या करण्यात आली. जपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होणार आहे. त्यानिमित ते नारा शहरातील एका प्रचारसभेला संबोधित करत होते.
त्यावेळी ४२ वर्षीय हल्लेखोराने त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. त्यात ते जबर जखमी झाले. पोलिसांनी संशयित आरोपीस घटनास्थळीच ताब्यात घेतले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हल्लेखोराचे नाव यामागामी तेत्सुया असून, तो आबेंच्या धोरणांवर नाराज होता.
शिंजो आबे यांना दोन गोळ्या लागल्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर तात्काळ त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने नारा मेडिकल यूनिव्हर्सिटी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे सलग सहा तास त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण उपचारावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्याने आबेंवर का गोळीबार केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण तो आबेंच्या धोरणांवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
जपानी माध्यमांनुसार, गोळी लागल्यानंतर आबेंना हृदयविकाराचा झटकाही आला होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, घटनास्थळी गोळीबार झाल्यानंतर आबेंच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिजो आबे यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करीत एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला.
📌 ९२ पालिकांच्या निवडणुका जाहीर
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने राज्यातील जनतेचे निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते.
अखेर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपालिकांची व ४ नगरपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. आता १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. १७ जिल्ह्यातील कमी पाऊस पडणाऱ्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत.
उमेदवारी अर्ज २० जुलै उपलब्ध.
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २२ ते २८ जुलै.
अर्जाची छाननी २९ जुलै.
अर्जमागे घेण्याची मुदत ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत.
उमदेवारी अर्जावरील आक्षेप ८ ऑगस्ट पर्यंत.
मतदान १८ ऑगस्ट
मतमोजणी आणि निकाल १९ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल.
📌 पहिली वातानुकूलित (एसी) डबल डेकर बस : सप्टेंबरपासून सेवेत
लंडनच्या धर्तीवर पहिली वातानुकूलित बस : बेस्टचा निर्णय
बेस्ट प्रवास अधिक सुकर व्हावा तसेच प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढावी, यासाठी सप्टेंबरमध्ये पहिली वातानुकूलित दुमजली बस दाखल होणार आहे.
ही लंडनच्या धर्तीवर पहिली वातानुकूलित दुमजली बस असेल. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये एक दुमजली वातानुकूलित नमुना बस दाखल होईल, चाचणी पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये प्रत्यक्षात ही बस सेवेत येईल.
एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. दुमजली बसची प्रवासी क्षमता ७४ आहे. एकमजली आणि दुमजली बसचे आकारमानही सारखेच असते. त्यामुळे या दोन्ही प्रकारातील बस रस्ता व्यापण्याचे प्रमाण सारखेच आहे. त्यामुळे दुमजली बसमधून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असल्याने उपक्रमाकडून दुमजली बसची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे.
नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून, या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे. बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड तसेच दोन स्वयंचलित दरवाजे असतील. त्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल. सीसीटीव्ही कॅमेरे, बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्था असेल, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.
५५ ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारणार :बेस्टने९०० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस १२ वर्षासाठी वेट लीजवर करण्याच्या कराराला मंजूरी दिली होती. यातील पहिला ताफा ऑगस्टमध्ये दाखल होणार आहे. महानगरात इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी जवळपास ५५ दिकाणे निवडण्यात आली आहेत. पुढील ३ ते ४ महिन्यांत आणखी चार्जिग स्टेशन उभारले जातील. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या